गेल्या अनेक वर्षांपासून वडगावशेरी मतदारसंघात ‘आखाड महोत्सव’ साजरा केला जातो. मतदारसंघातील नागरीक, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र आप्तेंष्ट यांच्यासाठी हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. दरवर्षी हजारो जण या जेवणाचा आनंदाने आणि हक्काने आस्वाद घेत असतात. यंदाही पूर्वनियोजनाप्रमाणे आज (शुक्रवार) ‘आखाड महोत्सवा’चं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु गेली दोन दिवस शहरात पावसामुळं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन या संकटाला अनेकांना सामोरं जावं लागलं.
माझ्या वडगावशेरी मतदारसंघातही शांतीनगर, आशानगर, भारतनगर, यंशवतनगर, कलवड वस्ती, साईनाथनगर या भागातील अनेक कुटुंबांना या पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. काल कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याचा आम्ही कसोशिने प्रयत्न केला. आजही परिस्थिती शंभर टकके पूर्वपदावर आली नसल्याने अशा परिस्थितीत ‘आखाड महोत्सव’ साजरा करणं योग्य वाटलं नाही. कारण ज्यांच्यावर पूरस्थिती ओढवली ती सर्व माणसं नेहमीच माझ्या सुख-दुःखात सहभागी झालेली आहेत. माझ्याच कुटुंबाचा ती एक भाग आहेत. त्यामुळं ते अडचणीत असताना ‘आखाड महोत्सव’ साजरा करणं शक्यच नव्हतं.. परंतु या कार्यक्रमाची सर्व तयारी आधीच झालेली असल्याने हा कार्यक्रम औपचारीपणे साजरा न करता या पूरग्रस्तांना जेवण देण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला आणि कार्यकर्ते व मित्रपरिवारानेही ही कल्पना उचलून धरली. त्यानुसार जेवण तयार करुन आणि त्याचे पॅकेट तयार करुन वेगवेगळ्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी असलेल्या सुमारे ३ हजारहून अधिक पूरग्रस्तांपर्यंत आम्ही सर्वांनी मिळून हे पॅकेट पोचवले. आज अडचणीत असलेल्या आणि नेहमीच माझ्या पाठीशी असलेल्या माझ्या जनतेची या माध्यमातून मला सेवा करता आली, याचं मनापासून समाधान आहे…