सध्या अनेक जण वैभव सूर्यवंशीची तुलना सचिन तेंडुलकरशी करत आहेत.
सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन होता, तेव्हा अनेक वरिष्ठ खेळाडूंनी त्याला स्लेजिंग करून दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण सचिनने नेहमी आपल्या बॅटने उत्तर दिलं आणि आपल्या खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांचा आदर मिळवला. त्याने क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे हे सिद्ध केलं.
सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी हेही आक्रमक स्वभावाचे होते, पण त्यांची आक्रमकता मैदानावरील कामगिरी आणि नेतृत्वापुरतीच मर्यादित होती.
सामना संपल्यानंतर वाद घालणे किंवा भांडण करणे हे क्रिकेटच्या परंपरा आणि मूल्यांशी सुसंगत नाही. जर श्रीलंकेच्या खेळाडूंविरुद्ध वैभवने दाखवलेली आक्रमकता व्यवस्थापनाकडून योग्य ठरवली गेली, तर तो क्रिकेटविश्वाला चुकीचा संदेश जाईल आणि भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेलाही ते योग्य ठरणार नाही.
त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, जर अशा वर्तनाचं समर्थन आणि गौरव केलं गेलं, तर उद्या इतर युवा खेळाडूही त्याच मार्गाचा अवलंब करतील.
पण वरिष्ठ खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्यातच सार्वजनिक वाद-विवाद आणि संघर्ष होत असतील, तर नवोदित खेळाडूंनी नेमकं कोणाकडून आणि काय शिकायचं?