विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन
नांदेड : नांदेड जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार असलेल्या अनेक नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजि. प्रशांत इंगोले यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी त्यांनी निवडणूक निरीक्षकांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
इंजी. प्रशांत इंगोले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने त्यांनी नांदेड-वाघाळा महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपरिषदांमधील नगरसेवक तथा विधान परिषद मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणावर नगरसेवक उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
अनेक नगरसेवकांचे मोबाईल फोन बंद अथवा ‘नॉट रिचेबल’ असल्याचे आढळून आले असून, प्रत्यक्ष भेटीचे प्रयत्न करूनही संबंधित लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले नसल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित असताना, मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी संपर्काबाहेर असल्याने अनेक शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
इंजी. इंगोले यांनी म्हटले आहे की, हे नगरसेवक जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असून त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत नैतिक व वैधानिक जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा अचानक संपर्क तुटणे व सार्वजनिक जीवनातून दूर राहणे ही बाब गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही निवडणुकांमध्ये विविध प्रकारचे राजकीय दबाव, प्रलोभने किंवा इतर माध्यमांचा वापर करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा होत आल्याचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीत काही मतदार नगरसेवकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे का, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जात आहे का अथवा त्यांचे स्वातंत्र्य बाधित झाले आहे का, याबाबत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
तथापि, कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षावर थेट आरोप करण्याचा आपला हेतू नसून, निवडणूक प्रक्रियेची शुचिता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राहावी या उद्देशाने ही बाब निवडणूक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका मुक्त, निष्पक्ष, भयमुक्त व पारदर्शक वातावरणात होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत इंजि. प्रशांत इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक चौकशी करावी, मतदार नगरसेवकांची सुरक्षितता व स्वातंत्र्य सुनिश्चित करावे तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आणि कायद्याच्या चौकटीत पार पडेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनाही देण्यात आल्या असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
#PrashantIngole #NandedMLCElection #MaharashtraPolitics
#LocalAuthoritiesConstituency #ElectionTransparency
#FreeAndFairElections
#ElectionObserver
#DemocracyMatters
#ElectoralIntegrity
#NandedNews
#MunicipalCouncillors