ठाणेकरांसाठी अस्सल हापूसचा मेळा पुन्हा सजला…
गेली १९ वर्षे अविरत सुरू असलेला ठाण्यातील आंबा महोत्सव यंदाही महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरू झाला. ठाण्याच्या गावदेवी मैदानात चिमुकल्या पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रसिद्ध अभिनेते अमोघ चंदन यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, “गेली १९ वर्षे सुरू असलेली ही आंबा महोत्सवाची चळवळ कौतुकास्पद असून, ठाणेकर म्हणून मला याचा अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने तसेच संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित हा महोत्सव १ मे ते १० मे दरम्यान सुरू राहणार आहे.
या प्रसंगी माझ्यासह सौ. कमल केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा महोत्सव केवळ आंबा विक्रीचा नाही, तर कोकणातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देणारी एक जनचळवळ आहे. कोणताही मध्यस्थ न ठेवता शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत अस्सल हापूस पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा आणि ठाणेकरांना अस्सल हापूसची गोड चव अनुभवता यावी, यासाठी सर्वांनी गावदेवी मैदानातील आंबा महोत्सवाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करतो.
कोकणच्या शेतकऱ्यांना बळ द्या… स्थानिक उपक्रमांना साथ द्या… आणि अस्सल हापूसचा आनंद घ्या!
#आंबा_महोत्सव #Thane #HapusMango #KonkanFarmers #SanjayKelkar #ठाणे #महाराष्ट्रदिन