रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि. ७-८ डिसेंबर २०२५ रोजी प्रबोधिनीच्या उत्तन येथील ‘ज्ञान-नैपुण्य’ केंद्रामध्ये “निवडणूक प्रचारासाठी "AI मास्टरक्लास” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यशाळेत ए.आय. (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा निवडणूक व्यवस्थापनातील उपयोग आणि प्रत्यक्ष वापर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने (Online) करण्यात आले. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच मासटरक्लास असल्याचे सहस्रबुद्धे यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे उत्तर मुंबईचे महासचिव, निखील व्यास यांनी निवडणुकीसाठी अधिक नाविन्यपूर्ण पद्धतीने या तंत्रज्ञानाचा वापराविषयी सहभागींना संबोधीत केले.
प्रमुख मार्गदर्शक, मल्हार पांडे यांच्यासह सम्यक साबळे, आदिनाथ कोल्हापूरे, सौरभ भरले, अॅड. विश्वंभर भोपळे या मास्टर ट्रेनर्सनी ए.आय.च्या नेमक्या प्रॉम्प्ट्सचे लेखन, कौशल्यपूर्ण वापर, विविध ए.आय. टूल्सचा निवडणूक प्रचारासाठी, बूथ व्यवस्थापनासाठी कसा वापर करता येतो याबद्दल मार्गदर्शन केले. सोशल मीडिया क्रिएटिव्ह्स, ऑडिओ-व्हिडिओ निर्मिती, निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी लागणारी सामग्री तयार करण्याचे कौशल्य सहभागींना प्रत्यक्ष सरावातून देण्यात आले.
प्रभाग / मतदारसंघातील विविध प्रकारचा डेटा संकलन आणि विश्लेषण तसेच सोशल मीडियाचे धोरणात्मक नियोजन करण्यासाठी ए.आय.चा वापर आणि सोशल मीडिया ऑटोमेशन टूल्स हाताळणे यासारख्या प्रत्यक्ष उपयोगी बाबींवरही भर देण्यात आला. या प्रसंगी ए.आय.चा वापर करताना अधिकृत, विश्वसनीय माहिती पडताळण्यावर प्राधान्य देण्याचेही भान सहभागींना देण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये गोवाराज्यासह, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमधून विविध राजकीय पक्षांच्या ४१ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेचे संचालन प्रबोधिनीचे राहुल टोकेकर आणि अनिल पांचाळ यांनी केले.
#AIMasterclass #Prabodhini #ElectionTech #DigitalCampaigning #AITraining