महाराष्ट्रात स्वतंत्र स्पेस-टेक धोरणाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी!
महाराष्ट्रातील उदयोन्मुख अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी, स्वदेशी रॉकेट विकास, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रणोदन प्रणाली, उपग्रह तंत्रज्ञान तसेच संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप्सना आवश्यक शासकीय पाठबळ उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदनाद्वारे विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.
यावेळी पुणेस्थित BAAS Technologies Pvt. Ltd. या स्टार्टअपच्या कार्याची माहिती देत, पुनर्वापर करण्यायोग्य उप-कक्षीय (Sub-Orbital) आणि कक्षीय (Orbital) प्रक्षेपण वाहनांच्या विकासासाठी कंपनीकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा दिला. केंद्र शासनाचे अनुदान आणि खाजगी गुंतवणुकीच्या बळावर अवघ्या दोन वर्षांत कंपनीने उल्लेखनीय प्रगती साधली असून महाराष्ट्रातूनच जागतिक दर्जाचे अंतराळ तंत्रज्ञान विकसित करण्याची भूमिका यावेळी मांडली.
इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्पेस-टेक क्षेत्राला अधिकृत मान्यता, जमिनीवरील चाचण्यांसाठी केंद्रीकृत परवानगी प्रक्रिया, संशोधन व विकासासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी शासकीय सहाय्य, प्रणोदन व रॉकेट चाचणी सुविधांसाठी स्वतंत्र जागा तसेच स्टार्टअप्ससाठी विशेष आर्थिक प्रोत्साहन व अनुदान योजना उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
भारताच्या वाढत्या खाजगी अंतराळ क्षेत्रात महाराष्ट्राने नेतृत्वाची भूमिका बजावावी, राज्यातील युवा संशोधक, अभियंते आणि उद्योजकांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना अधिक बळ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र ‘स्पेस-टेक धोरण’ राबविण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित केली.
महाराष्ट्र ही उद्योग, संशोधन आणि नवोन्मेषाची भूमी असून आगामी काळात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातही राज्य देशाला दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाकडे सकारात्मक दृष्टीने लक्ष देण्याची विनंती केली.
#SpaceTechMaharashtra #RocketDevelopment #Aerospace #Innovation #BAASTechnologies
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra